भीतीदायक! राज्यातील ‘या’ शहरात विद्युतदाहिन्याही पडू लागल्या अपुऱ्या

पारंपरिक पद्धतीने करणार कोविड मृतांचे अंत्यविधी : हतबल पालिका प्रशासनाचा निर्णय

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोना परिस्थितीने रौद्र रुप धारण केले आहे. शहरातील बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असतानाच आता मृतांच्या आकड्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे.

करोनाबाधित रुग्णांचा अंत्यविधी विद्युतदाहिनीमध्ये केला जातो. मात्र मृतांची संख्या वाढल्याने शहरातील विद्युतदाहिन्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. परिणामी मृतांचा अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांना आठ ते दहा तास वेटिंग करावी लागत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या पिंपरी चिचवड महापालिका प्रशासनाने करोनाबाधित मृतांचा अंत्यविधी पारंपारिक पद्धतीनेही करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरामध्ये सध्या निगडी, सांगवी, भोसरी, नेहरूनगर आणि लिंक रोड येथील शवदाहिनी विद्युतदाहिनींमध्ये मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांत मृतांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या विद्युतदाहिनींवर ताण वाढला आहे. एका मृतादेहाचा अंत्यविधी करण्यासाठी साधारणपणे अडीच तास वेळ लागतो. शहरामध्ये दररोजच्या मृतांची संख्या 40 ते 50 च्या घरात आहे. त्यामुळे विद्युतदाहिनीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी नातेवाइकांना मोठी प्रतीक्षा करावी लागते.

यावरुन स्मशानभूमीतील कर्मचारी आणि नातेवाइकांमध्ये वादाचेही प्रसंग ओढावत आहेत.
करोना मृत्यू रोखण्यात आता प्रशासन कमी पडू लागले आहे. यामुळे करोनाबाधित मृतांचे अंत्यविधी आता पारंपारिक पद्धतीने लाकडांवर दहन केले जाणार आहे. याबाबतचा आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी काढला आहे.

अंत्यविधी करण्यासाठी वैद्यकीय विभागामार्फत समन्वयक नेमण्यात आले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी समन्वयकावर देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारास विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत. जम्बो हॉस्पिटल येथे आणि 5 स्मशानभूमींमध्ये प्रत्येकी 4 असे 20 कामगार वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

सहा दिवसांत 265 मृत्यू
पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आलेख सातत्याने उंचावत आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये तब्बल 265 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 113 बाहेरील रुग्णांचा समावेश आहे. शहरातील रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाच बेड, व्हेंटिलेटर व रेमडेसिविरचा रुग्णांना वेळेत पुरवठा होत नसल्याने मृतांची संख्या वाढली आहे.

बाहेरील रुग्णांचा अंत्यविधीही शहरातच
कोविड 19 च्या नियमानुसार शहरात उपचार घेत असताना शहराबाहेरील रुग्णांचा मृत्यू झाला तर शहराच्या हद्दीमधील स्मशाभूमीध्येच अंत्यविधी केला जावा. जेणेकरून मृतदेह बाहेर नेत असताना इतरांना संसर्ग होणार नाही. त्यामुळे बाहेरील रुग्णांवरही शहरातील विद्युतदाहिनीमध्येच अंत्यविधी केले जातात. आजपर्यंत शहरात उपचार घेत असताना करोनामुळे तब्बल 980 शहराबाहेरील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील विद्युतदाहिनीमध्ये करोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र मृत्यू वाढल्याने अंत्यविधी करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे नातेवाइकांची परवड होते. परिणामी आता करोनाबाधित मृतदेहांचे पारंपारिक पद्धतीने लाकडाच्या सरणावर दहन केले जाणार आहे.
– शिरीष पोरेड्डी, प्रवक्ते, कोविड

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.