पिंपरी-चिंचवडमध्येही अंत्यविधीसाठी वेटींग; स्मशानभूमीत रुग्णवाहिकेच्या रांगा

प्रचंड ताण येत असल्याने बंद पडताहेत विद्युत दाहिन्या

पिंपरी – भाटनगर, पिंपरी येथील दोनपैकी एक विद्युत दाहिनी गुरुवारी सकाळी बंद पडली. त्यामुळे नातेवाइकांना अंत्यविधीसाठी साडेदहा तासांचे वेटींग करावे लागले.

पिंपरी चिंचवड शहरातील उच्चांक पातळीवर गेलेली करोना बाधितांची संख्या आता निम्म्यावर आली आहे. मात्र करोना बाधितांच्या मृत्यूमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 40 हून अधिक करोना बाधितांचा मृत्यू होत आहे. बुधवारी शहरात 45 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी झाली आहे.

एकीकडे करोना बाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना दुसरीकडे दिवस रात्र सुरू असलेल्या विद्युत दाहिन्यांवर ताण येत असून त्या बंद पडत आहेत. बुधवारी रात्री निगडी येथील दोनपैकी एक विद्युत दाहिनी बंद पडली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी तिथे तीन मृतदेह अंत्यविधीसाठी रांगेत होते. तर पिंपरी येथील दोनपैकी एक विद्युत दाहिनी गुरुवारी सकाळी बंद पडली. त्यावेळी अंत्यविधीसाठी सात मृतदेह रांगेत होते.

एका विद्युत दाहिनीत मृतदेहाचे दहन करण्यासाठी किमान दीड तासांचा वेळ लागतो. त्यामुळे सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारणतः साडेदहा तासांचा वेळ लागला. बंद पडलेली पिंपरीतील विद्युत दाहिनी सुरू करण्यासाठी महापालिकेचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आपल्या कुटूंबातील व्यक्‍तीचा मृत्यू झाल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइक स्मशानभूमीत नंबर येण्याची वाट पाहात होते. त्यातील काही जणांना मधुमेह व रक्‍तदाबाचा त्रास असल्याने त्यांनी काहीतरी खाऊन घ्यावे, यासाठी इतरजण प्रयत्न करीत होते. मात्र अंत्यसंस्कार झाल्याशिवाय खाणार नसल्याचे ते ठामपणे इतरांना सांगत होते.

तर काहीच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. घरातील व्यक्‍तीचा मृतदेह रुग्णवाहिकेत सोडून नातेवाइकांना नंबर येईपर्यंत जाताही येत नव्हते. त्यामुळे स्मशानभूमीत रुग्णवाहिकेच्या रांगा लागल्या होत्या.

स्मशानभूमीतही दादागिरी
मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी काहीजण तास्‌नतास वाट पाहत थांबले होते. मात्र काही मृतांचे नातेवाइक स्मशानभूमीत येऊन आधी आमच्या मृतदेहावर अंत्यसस्कार करावे, यासाठी दादागिरी करताना दिसून आले. तर काहींनी अंत्यसंस्काराला लवकर नंबर लागावा, यासाठी मृतदेह येण्यापूर्वीच कागदपत्र घेऊन नातेवाइकांना स्मशानभूमीत पाठवत होते. मात्र मृतदेह आल्याशिवाय नंबर लावणार नसल्याचे येथील कर्मचारी ठामपणे सांगत होते. त्यावरून कर्मचारी आणि नातेवाइकांमध्ये बाचाबाचीही होत होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.