महाबळेश्वर – ब्रिटीशकालिन उत्तम वास्तुकलेचा नमुना असलेले व स्थानिक जांभ्या दगडातील बांधकाम असलेली येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत नूतनीकरणानंतर आता कात टाकून नव्या जोमाने रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. शुक्रवारी (दि. 8) या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत नूतनीकरणाचे औपचारिक गणेश पूजन करून साध्या पध्दतीने लोकार्पण होत आहे.
ब्रिटीशांचे उन्हाळयातील आवडते ठिकाण महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे. लोकसंख्या कमी असतानाही गावातील लोकांच्या प्राथमिक सुविधांसाठी येथे ब्रिटीशांनी नगरपालिका सुरू केली. आरोग्याच्या सुविधांसाठी ग्रामीण रुग्णालय सुरू केले. हे रुग्णालय राज्यातील सर्वांत मोठे ग्रामीण रुग्णालय म्हणून ओळखले जाते. ब्रिटीशांनी बांधलेले हे रुग्णालय प्रारंभी येथील पालिका चालवित होते. परंतु, निधीअभावी पालिकेने हे रुग्णालय शासनाला हस्तांतर केले. शासनाने रूग्णालय ताब्यात घेतले.
परंतु, लोकांना काही आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त झाले. रूग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली. हे रुग्णालय खासगी संस्थेकडे चालविण्यासाठी देण्याची मागणी जोर धरू लागली. आघाडी सरकाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. परंतु, महाविकास आघाडीने स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीप्रमाणे रूग्णालय खासगी संस्थेकडे देण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यासाठी तत्कालिन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी पुढाकार घेतला.
आमदार मकरंद पाटील यांनीही पाठपुरावा केला. ना. एकनाथ शिंदे यांनी हस्तांतराचे सर्व सोपस्कार पूर्ण करून फेबुवारी 2019 मध्ये या रूग्णालयाचे पुढील एक वर्षासाठी काही अटींवर हस्तांतर केले. रेडक्रॉस सोसायटी संचालिक बेल एअर यांनी हे रुग्णालय चालविण्यासाठी ताब्यात घेतले.
रुग्णालयाचे हस्तांतर तर झाले. परंतु, ते चालविणे तारेवरची कसरत आहे हे लवकरच लक्षात आले आणि रुग्णालयाला निधीची चणचण भासू लागली. रुग्णालय चालविण्यासाठी निधीची कमतरता व रुग्णालय इमारतीच्या नूतनीकरणाचा खर्च कसा करायचा, हा मोठा प्रश्न उभा राहिला. याचवेळी मुंबईचे उद्योगपती जयसिंह मरीवाला यांनी नूतनीकरणाची जबाबदारी घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाबळेश्वरला आले. तेव्हा त्यांनी या रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी नूतनीकरणासंदर्भात काही सूचना केल्या. इमारतीच्या ढाच्यामध्ये बदल न करता त्याचा ब्रिटीशकालिन लुक आहे तसाच ठेवून नुतनीकरण करण्यात यावे, अशी सूचना ठाकरे यांनी केली.
ग्रामीण रूग्णालयाची इमारत 25 हजार स्क्वेअर फूट आहे. पैकी 14 हजार स्क्वेअर फूट इमारतीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय जयसिंह मरीवाला यांनी घेतला. त्यांनी निधी गोळा करण्यास प्रारंभ केला. त्यांचा एक ट्स्ट आहे. त्या माध्यमातून शिवाय महाबळेश्वर येथे बंगले असणाऱ्या धनिकांना जयसिंह मरीवाला यांनी मदतीचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद मिळाला व निधीची अडचण दूर झाली. मुंबई येथील वास्तूविशारद धृती वैदय यांनी या नूतनीकरणासाठी तब्बल साडेतीन कोटी रूपयांचे बांधकाम साहित्य पुरविले. अशाच प्रकारे अनेक हात मदतीसाठी पुढे आले.
सहा महिन्यांत ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले. करोनाचा मुकाबला करण्यासाठी युध्दपातळीवर हे रूग्णालय तयार व्हावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली हाती. कामातील अडचणीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोलाची मदत केली.