पुसेगाव -डोंगरची काळी मैना म्हणून परिचित असलेली करवंदे माण-खटाव भागातील डोंगरदऱ्यात पूर्णपणे बहरली आहेत. गच्च भरलेल्या करवंदांच्या जाळ्या लक्ष वेधून घेत आहेत. डोंगराच्या आसपासच्या गावांमधील चाकरमानी सुट्टीत आल्यानंतर करवंदांचा आस्वाद घेतात; परंतु यावर्षी लॉकडाऊनमध्ये हा रानमेवा उपेक्षित राहिला आहे. कधी एकदा लॉकडाऊन संपतो व रानमेव्याचा आस्वाद घेतो, अशी लोकांची अवस्था आहे.
पण लॉकडाऊन आणखी वाढल्यास यावर्षी रानमेव्याचा आस्वाद मिळणार नाही, अशी खंत व्यक्त होत आहे. खटावपासून पश्चिमेकडे दहा किमी अंतरावर असलेल्या रामाच्या डोंगरावर रामेश्वराचे प्रसिद्ध मंदिर व भोवताली घनदाट जंगल आहे. हा परिसर मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जातो. जैवविविधतेने नटलेल्या या डोंगरावर साग, ऐन, धावडा, जांभूळ, आंबा, चिंच, बिबवी, देशी आवळा, करवंदांच्या जाळ्या व विविध औषधी वनस्पती आहेत. निसर्गाच्या कृपेने रानमेव्याने लगडलेली दाट झाडी आहेत.
फाल्गुन महिना सुरू झाल्यानंतर या डोंगरावर गेल्यास काटेरी जाळ्यांमध्ये बहरलेल्या करवंदांचे दर्शन सर्वप्रथम होते. गेल्या वर्षी अबालवृद्ध उन्हाळ्यात पहाटे लवकर उठून करवंदे तोडायला रानात जात. यंदा डोंगरावर शुकशुकाट आहे. काळ्या रंगाच्या करवंदांना बाजारात चांगली मागणी असते; परंतु या वर्षी करोनामुळे या रानमेव्याचा आस्वाद घेता येईल का, याबद्दल अनेक जण साशंक आहेत.