पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात तिसरी लाट आता कमालीची ओसरू लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील रूग्ण संख्या 50 च्या आत आली आहे. त्यामुळे सक्रिय करोना रुग्णसंख्या देखील घटली असून हा आकडा आता 408 इतका झाला आहे. त्यापैकी केवळ 47 रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी शहरात 41 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
शहरात मंगळवारअखेर 4 हजार 620 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. 3 लाख 58 हजार 751 जणांना करोनाची लागण झाली. सध्या 408 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 361 रुग्ण गृहविलगीकरणात असून 47 सक्रिय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 26 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 833 आहेत. आत्तापर्यंत 34 लाख 24 हजार 746 जणांनी करोना प्रतिबंधक लस घेतली आहे