मुंबई – महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात विक्रीच जोरदार वारे घोंगावत आहेत. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजार निर्देशांकावरही झाला. माहिती तंत्रज्ञान, धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 555 अंकांनी कमी होऊन 59,189 अंकांवर बंद झाला. काही दिवसांपूर्वी हा निर्देशांक 60,000 अंकांच्या वर गेला होता. मात्र त्यानंतर यामध्ये बरीच घट झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 176 अंकांनी म्हणजे 0.99 टक्क्यांनी कोसळून 17,646 अंकांवर बंद झाला.
याबाबत जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, क्रुड महाग होत असल्यामुळे जागतिक पातळीवर महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे गुंतवणूक डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्याकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
त्यामुळे शेअर बाजारात नफेखोरी जागतिक पातळीवर चालू असल्याचे दिसून येते. भारतातही महागाई डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदाराच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.
रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आयसीआयसीआय बॅंक, टाटा स्टील, बजाज ऑटो, एचसीएल टेक, सनफार्मा, टेक महिंद्रा या बड्या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही.
भांडवल सुलभता घटण्याची शक्यता
महागाई वाढण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची घोषणा शुक्रवारी होणार आहे. सध्यातरी रिझर्व्ह बॅंक व्याजदरांमध्ये वाढ करणार नसली तरी महागाई वाढू नये याकरिता भांडवल सुलभता कमी करण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे बुधवारी विक्रीचा जोर वाढल्याचे काही विश्लेषकांनी सांगितले. त्यातच क्रुडचे दर आज वाढून 82 डॉलर प्रति पिंपावर गेले आहेत. त्यामुळे भारतामध्ये इंधन महागण्याची शक्यता आहे.