मुंबई – शेअर बाजार निर्देशांक काल विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र आज शेअर बाजारात बरीच नफेखोरी होऊन निर्देशांकात काही प्रमाणात घट नोंदली गेली.
रिझर्व बॅंकेचे धोरण जाहीर झाले. यात व्याज दर कमी पातळीवर असूनही त्याच पातळीवर कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रिझर्व्ह बॅंकेने विकास दराचा अंदाज एक टक्क्याने कमी करून 9.5 टक्के इतका केला आहे. या अगोदर या वर्षाचा विकास दर 10.5 टक्के होईल असे बॅंकेने म्हटले होते.
शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 132 अंकांनी म्हणजे 0.25 टक्क्यांनी कमी होऊन 52,100 अंकावर बंद झाला. मात्र तरीही हा निर्देशांक 52,000 अंकाच्या पुढे असल्याबद्दल ब्रोकर्सनी समाधान व्यक्त केले. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 20 अंकांनी कमी होऊन 15,670 अंकावर बंद झाला.
सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 677 अंकांनी तर निफ्टी 234 अंकांनी म्हणजे दीड टक्क्यांनी वाढला आहे. रिझर्व्ह बॅंकेने आज जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो आणि रिव्हर्स रेपो दर पूर्वीच्या पातळीवर कायम ठेवले आहेत. त्याचबरोबर महागाईचा दर वाढून 5.11 टक्के या पातळीवर राहण्याची शक्यता बॅंकेने व्यक्त केली आहे.
भांडवल सुलभतेसाठी बॅंक सरकारी रोखे खरेदी करण्याचा कार्यक्रम चालू ठेवणार आहे. त्याचबरोबर बॅंकेने आदरातिथ्य, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी दुसऱ्या लाटेचा परिणाम झालेल्या उद्योगांना भांडवल सुलभता वाढविली आहे.
या उद्योगांनी रिझर्व्ह बॅंकेने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले. कालच्या प्रमाणे मिड कॅप आणि स्मॉल कॅप मुख्य निर्देशांकांपेक्षा जास्त प्रमाणात वाढले. आज बॅंकिंग, ग्राहक वस्तू, ऊर्जा, आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे या क्षेत्राचे निर्देशांक एक टक्क्यांपर्यंत कमी झाले तर तेल आणि नैसर्गिक वायू, भांडवली वस्तू आणि धातु क्षेत्राचे निर्देशांक काही प्रमाणात वाढले.