पुणे : कोरोनामुळे अनेक महिने मंदीचा सामना केल्यानंतर पुण्यातला रियल इस्टेट उद्योग पुन्हा उभारी घेत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मंदावलेली बांधकामं पुन्हा जोमात सुरू होत आहेत. त्यामुळे संपूर्ण उद्योगात सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बांधकाम सुरु असलेल्या फ्लॅट्सची गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.3 टक्क्यांनी वाढली आहे.
जानेवारी ते जून 2021 दरम्यान पुण्यात एकूण 12 हजार 558 फ्लॅट्स असलेले गृहप्रकल्पांचं बांधकाम सुरू झालं आहे. गेल्यावर्षी हा आकडा 9 हजार 944 होता. गेल्यावर्षी आणि यावर्षीची तुलना केली असता गेल्यावर्षीपेक्षा यंदा 26.3 टक्क्यांनी प्रकल्प वाढले आहेत.
यंदा बांधकामात वाढ झालेली असली तरी फ्लॅट्सच्या विक्रीमध्ये मात्र घट पहायला मिळत आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात पुण्यात 20 हजार 431 फ्लॅट्सची विक्री झाली होती. यावर्षी पहिल्या सहामाहीत 16 हजार 220 फ्लॅट्सची विक्री झाली आहे.
यावर्षी नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये २बीएचके असलेल्या घरांचं प्रमाण जास्त आहे. एकूण प्रकल्पांपैकी 72 टक्के घरं ही 2 बीएचके स्वरूपातली आहेत. त्यानंतर 3 बीएचके घरांचा वाटा जवळपास 19 टक्के आहे. वर्क फ्रॉम होम संकल्पनेमुळे मोठ्या घरांच्या मागणीत वाढ होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. ही मागणी लक्षात घेऊन विकासकांकडूनही मोठी घरं बांधण्याला प्राधान्य दिलं जात आहे.
कोरोनाकाळात स्वतःच्या मालकीच्या घरांचं महत्व वाढलं आहे. त्यामुळे स्वतःचं घर घेण्यासाठी खरेदीदारांमध्ये धडपड पहायला मिळत आहे. परवडणाऱ्या घरांचा मुद्दा बाजूला ठेवला तर स्वतःच्या मालकीचं घर घेण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. शहरात नव्यानं बांधकाम सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये फ्लॅट्सची किंमत 45 लाखांपासून ते 75 लाखांपर्यंत आहे. अशा फ्लॅट्सची संख्या जवळजवळ 62 टक्के आहे. तर 45 लाखांहून कमी किंमत असलेल्या फ्लॅट्सची संख्या 25 टक्के एवढी आहे.