मुंबई- महागाईच्या भीतीमुळे जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी बॅंकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहक वस्तू क्षेत्राच्या कंपन्यांची जोरदार विक्री होऊन सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 508 अंकांनी कमी होऊन 53,886 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 157 अंकांनी म्हणजे 0.97 टक्क्यानी कमी होऊन 16,058 अंकावर बंद झाला.
डॉलर वधारत असल्यामुळे परकीय गुंतवणूकदाराकडून होत असलेल्या विक्रीमुळे शेअर निर्देशांकांना आधार मिळाला नाही.
काल या गुंतवणूकदारानी 170 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. भारतातील महागाईची आणि औद्योगिक उत्पादनाची याकडेवारी सायंकाळी जाहीर होणार होती. त्यामुळे गुंतवणूकदार कुंपणावर बसून होते असे विश्लेषकांनी सांगितले.
इन्फोसिस कंपनीच्या शेअरचा भाव आज तब्बल अडीच टक्क्यांनी कोसळला. नेस्ले इंडिया, पॉवर ग्रीड, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. फक्त एनटीपीसी, एअरटेल आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात दोन टक्क्यापर्यंत वाढ झाली.
अमेरिकेची महागाई उच्च पातळीवर असल्यामुळे जुलै महिन्यामध्ये अमेरिकेची रिझर्व्ह बॅंकेने पाऊण टक्के इतकी व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर चीनमधील करोनाची परिस्थिती बिघडत चालल्यामुळे चीनकडून मागणी कमी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये कच्च्या तेलाचे दर सध्या विक्रमी पातळीवरून खाली घसरले आहेत.
जोरदार विक्रीमुळे मिडकॅप 0.52 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.51 टक्क्यांनी कमी झाला. माहिती तंत्रज्ञान, धातू, वाहन, ग्राहक वस्तू, बॅंकिंग या क्षेत्राचे निर्देशांक आज सव्वा टक्क्यापर्यंत कमी झाले. दूरसंचार आणि ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांक मात्र काही प्रमाणात वाढले. चीन, दक्षिण कोरिया, जपान, हॉंगकॉंग, अमेरिका, युरोप येथील शेअर निर्देशांकातही घट झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारामध्ये सकाळपासून विक्रीचा जोर कायम होत असे दिसून आले.
………