मांडवगण फराटा – करोना व संचारबंदीमुळे दूध व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. विक्रीव्यवस्था ढासळल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत उठाव नाही. मागील महिन्यात 32 रूपये असणारा दर आता 22 रुपये झाला आहे. राज्य शासनाने सहकारी दूध संघाकडून दररोज 10 लाख लिटर दूध खरेदी करून त्याला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचा निर्णय (दि. 10) एप्रिल रोजी घेतला होता.
मात्र, यामध्ये शेतकऱ्यांकडून दूध खरेदी कशी करणार, त्याचे पैसे त्यांना पैसे कसे दिले जाणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकरी व संचालक मंडळातही गोंधळाची स्थिती असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
सध्या दुधाच्या उत्पादन व मागणीत मोठी तफावत आहे. दूध, दूध भुकटीचे दर निम्यावर आल्याने दुधाचा दर 3.5 फॅट तर 8.5 एसएनएफला प्रतिलिटर 32 रुपयांवरून 22 रुपयांवर दर आला आहे. संचारबंदीमुळे सर्वत्र दुकाने, हॉटेल, आईस्क्रीम शॉप बंद आहेत. त्यामुळे दुधाच्या विक्रीत विक्रमी घट झाली आहे. खासगी तसेच सहकारी दूध संस्थाची दुधाची विक्री 30 ते 40 टक्क्यांवर आली आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने दिवसांत पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे.
त्यामुळे जनावरांना चाऱ्याची कमतरता भासते. उन्हाची तीव्रता वाढत आहे. ताक, दही, लस्सी, आईस्कीम, चोकोबार, फ्लेवर्ड मिल्क, पनीर, श्रीखंड, आम्रखंड आदी दुधाच्या उपपदार्थांना जास्त प्रमाणात मागणी सुरू होते. त्यामुळेच साहजिकच दुधाच्या मोठ्या प्रमाणात मागणीत वाढ होते. पर्यायाने दूध दर देखील वाढतो. परंतु यावेळी मात्र, करोनारसारख्या महाभयंकर संकटामुळे शेतीमालाबरोबर दुधाच्या दराला ग्रहण लागले आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाल्याने चाऱ्याच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षी 400 रुपये प्रतिशेकडा मिळणारे उसाचे वाढे आता 700 रुपये प्रतिशेकडा मिळत आहे.