नांदेड : शहरातील देगलूरनाका भागातील रहमतनगर येथील कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाधित महिलेला उपचारासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान,या महिलेचा मृत्यू झाला आहे.
रहेमतनगर येथील ही महिला काही दिवसांपूर्वी डॉक्टर लेन भागातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. उपचार सुरू असताना तिला श्वास घेण्यास त्रास होत होत होता आणि दमही लागत होता. त्या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. ती महिला उपचार घेत होती, त्या खाजगी रुग्णालयाच्या आतील सर्व भाग निर्जंतुक करून रुग्णालय सील करण्यात येत आहे. त्याचबरोबर या महिलेच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वब घेऊन तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. दरम्यान, रहमतनगर हा संपूर्ण भाग सील करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.