अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने दोन आठवड्यांपूर्वी इंस्टाग्राम अकाउंट डिऍक्टीव्हेट केले होते. या अगोदर प्रिया इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय होती आणि तिच्या चाहत्यांसाठी लेटेस्ट फोटोशूटपासून मजेशीर व्हिडिओही अपलोड करत होती. मात्र, काही दिवसांपासून ती सोशल मीडियापासून अचानक गायब झाली होती.
लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियापासून ती दूर राहण्यामागे अनेक तर्कवितर्क जोडले जात होते. मात्र, आता प्रियाने यावर “प्रकाश’ पाडला आहे. एका व्हिडिओमार्फत तिने आपले “सोशल मीडिया व्रत’ तोडले आहे. आणि इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्याचे कारण सांगितले आहे.
प्रियाने एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “सध्या लॉकडाऊन असल्यामुळे लोक सोशल मीडियाला चिकटले आहेत. मात्र मी या दरम्यान स्वतःसाठी वेळ काढला. यामुळे मी इंस्टाग्राम अकाउंट बंद केले’. प्रिया पुढे म्हणाली की, “या दोन आठवड्यात मला मनःशांती लाभली. त्यामुळे यापुढेही मी सोशल मीडियापासून लांबच राहणार आहे’. प्रियाने व्हिडिओमध्ये ट्रोलिंग करणाऱ्यांवर नाराजी दर्शविली आहे. प्रिया ट्रोलिंगला घाबरून सोशल मीडियापासून लांब राहत आहे, असे तिला ट्रोल करण्यात आले होते. यावर प्रिया म्हणाली की, “ट्रोलिंगला घाबरत नसून स्वतःला वेळ देता यावा म्हणून सोशल मीडियापासून लांब राहत आहे’.