शिंदे वासुली -चाकण एमआयडीसी टप्पा दोनमध्ये वासुली ग्रामपंचायत हद्दीतील एका कंपनीत 38 वर्षीय कामगाराचा तपासणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. तो रुग्ण काम करीत असलेला रिसर्च अँड डिझायनिंग युनिट काल रात्रीच सील केले असून संपर्कात आलेल्या एकूण 28 जणांना होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना दिल्याचे वराळे उपकेंद्रांतील वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास टेकवडे यांनी सांगितले. त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील बाधीत रुग्णांची संख्या चार झाली आहे. हे सर्व करोना संसर्ग झालेले कामगार स्थानिक नसून काळेवाडी, सोलापूर, पिंपरी चिंचवड भागातील आहेत.
वासुली ग्रामपंचायत हद्दीतील एका कंपनीत महत्त्वाच्या हुद्द्यावर काम करणाऱ्या संभाजीनगर, चिंचवड येथे राहणाऱ्या या कामगाराला करोना संसर्ग झाला आहे. त्याच्यावर भोसरीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये आयसोलेट करुन उपचार चालू आहेत. हा रुग्ण 26 तारखेला ताप आल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला असता 1 जूनला त्याचा तपासणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या आठ सहकारी कामगार व बसचालक, सिक्युरिटी गार्ड व बसमधील इतर कामगार अशा एकूण 18 कामगारांना होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, आज सकाळी वासुली ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने संबंधित कंपनीत जाऊन करोना बाधीत कामगार व संपर्कात आलेल्या इतर कामगारांची माहिती घेतली. यावेळी गावकामगार तलाठी दत्तात्रय केंगले, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे, वराळे व करंजविहीरे आरोग्य केंद्रांचे डॉ. शेख व डॉ. टेकवडे यांनी वस्तुस्थिती पाहणी करून अहवाल तालुका प्रशासनाला दिला आहे.