स्थानिक : “संसर्गाची भीती’
पोलीस : “असे घडलेच नाही’
पुणे – परराज्यांत जाण्याची परवानगी मागण्यासाठी सुमारे 700 ते 800 मजूर डेक्कन पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते. आजपर्यंत एक करोना संशयितही न सापडलेल्या या भागात मजूर मोठ्या संख्येने आल्याने स्थानिक नागरिकांत घबराट पसरली. पोलिसांनी मात्र “मजूर आले होते, पण त्यांची संख्या एवढी मोठी नव्हती. त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठवण्यात आले,’ अशी भूमिका मांडली. स्थानिकांच्या मते मात्र “मोठ्या प्रमाणात विनातपासणी झालेले स्थलांतरित येणे हे धोक्याचे आहे.’
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील पोलीस ठाण्यासमोर जवळपास 700 ते 800 परप्रांतीय मजूर एकत्र आले. आरोग्य तपासणी केल्याशिवाय ते येथे आलेच कसे? आलेल्या मजुरांमध्ये एकही करोनाबधित असेल, तर या भागात संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे असा जमाव होऊ देणे धोक्याचे आहे.’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “गावी जाण्याच्या परवागीसाठी मजूर जमले होते. ही संख्या साधारणपणे 100 ते 150 असावी. त्यांनी चौकशी केली. त्यानंतर ते परत गेले. या ठिकाणी फिजिकल डिस्टंन्सिग नियमाचे पालन करून आणि कायद्याच्या चौकटीतच परिस्थिती हाताळली आहे.’
डेक्कन पोलीस ठाण्यासमोर काही प्रमाणात नागरिक एकत्र आले होते. त्यांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी पाहिजे होती. त्याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर हे मजूर परत गेले. या ठिकाणी परिस्थिती तातडीने हाताळण्यात आली.
– दीपक लगड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन