टाकळी हाजी येथे शेतकरी मेळावा
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक राज्यकर्त्यांनी ठेवावी
टाकळी हाजी : दुधाला पाच रुपयांची दरवाढ देऊन शेतकरी दूधउत्पादक यांच्यावर होणारा अन्याय मी पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री असताना दूर केला होता. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे, अन्यथा जगाचा पोशिंदा बळीराजा पिढ्यान्पिढ्या कर्जबाजारी होत आहे. याला जबाबदार राज्यकर्तेच असल्याची टीका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली.
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते होते. यावेळी प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर सलगर, माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, रासपचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष विनायक रुपनवर, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता किरवे, अंकुश देवाडकर, माजी पंचायत समिती सदस्य राम कदम उपस्थित होते.
जानकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुलाने शेती न करता एकाने व्यवसाय दुसऱ्याने अधिकारी, आमदार व खासदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. राज्यातील मुलाचा यूपीएससी परीक्षेमध्ये टक्का वाढला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी रासपचे प्रदेशाध्यक्ष शेवते, माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, अशोक माशेरे, राम कदम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य गोरक्षनाथ दुबे यांनी, तर शहराध्यक्ष सिकंदर पटेल यांनी आभार मानले.