बिजिंग : चीनच्या महत्वाच्या हुबेई प्रांतात बुधावारी एका दिवसात कोरोना व्हायरसमुळे 38 जण मरण पावले. त्यामुळे मृतांची संख्या 170 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर 1700 नवे बाधीत आढळले आहेत.
कोरोना व्हायरसची साथ चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमधून सुरू झाली. त्यानंतर ती जगभर पसरली. वुहानमधून त्यांचे नागरिक नेण्यासाठी चीन प्रशासन भारतासह अन्य देशांच्या संपर्कात आहे.चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांनी मंगळवारी कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या विषाणूची वेळेवर आणि पारदर्शी माहिती देण्याचे आदेश त्यांनी दिले.
कोरोना विषाणूमुळे न्युमोनिया झालेल्यांची संख्या सात हजार 771 झाली आहे. चीनच्या 31 प्रांतात ही विषाणूंचे बाधीत आढळले आहेत. 170 जण मरण पावले असून अद्याप एक हजार 370 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 12 हजार 167 संशयित बाधीत असल्याचे चीनच्या आरोग्य विभागाने जाहीर केले.
रुग्णालयातून 124 नगरीकांना घरी सोडण्यात आले. विषाणूबाधीतांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या 88 हजार 693 जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले आहे. त्यापैकी दोन हजार 364 जणांना वैद्यकीय तपासणीनंतर सोडण्यात आल्याचे सरकारी वृत्त संस्था जिन्हूआने म्हटले आहे.
बुधावार अखेर हॉंगकॉंगमध्ये 10, मकाऊमध्ये सात तर तैवानमध्ये आठ बाधीत असल्याचे निश्चित झाले आहे.