पुणे – करोनामुळे ज्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा बहुतेक नागरिकांना ब्लडप्रेशर, मधुमेह याचबरोबर इतर आजार होते. त्याचबरोबर 12 रुग्णांना रुग्णालयात आणल्यानंतर 24 तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या डेथ रिपोर्टचे ऑडिट करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. यामुळे ससूनबरोबरच बाकीच्या रुग्णालयांशी चर्चा करण्यात येत आहे. आयसीएमआरने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. मेडिकल प्रोटोकॉल व्यवस्थित पाळला जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोणतीही अडचण येत नाही. रुग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. तसेच, करोनाचे निदान लवकर होत आहे. तरीही मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णाचा डेथ रिपोर्टचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनामुळे मृत्यू झालेल्या सुमारे 87 टक्के नागरिकांना हाय बल्डप्रेशर, मधुमेह हा आजार होता. करोनावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टास्क फोर्स स्थापन केली आहे. त्याचबरोबर आयसीएमआरने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांवर उपचार सुरू आहे.
– शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका
करोनाचे कोणतेही लक्षण जाणवत नसतानासुद्धा एखादी व्यक्ती करोनाबाधित असेल तर त्या व्यक्तीला घरीच क्वारंटाइन करण्याच्या सूचना आयसीएमआरने दिल्या आहेत. मात्र, या संदर्भात राज्य शासनाकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे यावर राज्य शासनाकडून सूचना आल्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
– डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त