जळोची: बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सदर व्यक्ती हा करोना संशयीत असून त्यांच्या घशातील द्रवाचा तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही. असे आरोग्य प्रशासनाने सांगितले.
सदर व्यक्तीला मागील तीन दिवसांपासून त्रास होत होता. आज शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. मात्र येथील खाजगी डॉक्टरांनी रुई येथे जाऊन तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सदर व्यक्तीस रुई येथील कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये नेण्यात आले होते. मात्र येथे करोनाचे रुग्ण असतात त्यामुळे मला उपचारासाठी पुण्याला घेऊन चला, असा आग्रह सदर व्यक्तीने त्याच्या नातेवाईकांकडे केला. त्यानुसार सदर व्यक्तीला पुणे येथे घेऊन जात असताना रस्त्या मध्येच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेतले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे त्यांना करोना संशयित समजले जात आहे. दरम्यान सदर करोना संशयित रुग्णावर शासकीय पातळीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.