बेंगळुरू – कर्नाटकचे दोन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, एचडी कुमारस्वामी आणि प्रसिद्ध पुरोगामी साहित्यिक के. वीरभद्रप्पा यांच्यासह 64 जणांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यासंदर्भातील एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलीस विभागाने कडेकोट बंदोबस्ताची तयारी सुरु केली आहे. कर्नाटकात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये म्हटले आहे की, “मृत्यू तुमच्या अवतीभोवती आहे, मरण्यासाठी तयार राहा.”, असा मेसेज व्हायरल होत आहे. मेसेज पाठवणाऱ्यांनी स्वत:ला सहिष्णू हिंदू असल्याचे सांगितले आहे.
मेसेजमध्ये पुढे लिहिले आहे की, “तुम्ही विनाशाच्या मार्गावर आहात. मृत्यू तुमच्या अगदी जवळ आहे. तुम्ही तयार रहा. मृत्यू तुम्हाला कोणत्याही रूपात मारू शकतो. तुमच्या कुटुंबीयांना कळवा आणि तुमच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करा.” हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारला अशा धमक्यांना हलक्यात घेऊ नका, असा इशारा दिला आहे.
विरोधी काँग्रेस आणि जेडी(एस) यांनी या घडामोडींसाठी सत्ताधारी भाजपला दोष दिला आहे आणि आरोप केला आहे की ते समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी हिंदू संघटनांना मदत आणि प्रोत्साहन देत आहेत.