मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या गुडीपाडवा मेळाव्यात आपली आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली. राज यांनी हिंदुत्वाचा जयघोष करत भाजपचं कौतुक केलं होतं. तेव्हापासून आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होणार या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राज ठाकरे यांची मुंबईतील राहत्या घरी जावून भेट घेतली.
रावसाहेब दानवे यांनी या भेटीची माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, या भेटीत दानवे आणि राज ठाकरे यांच्या हातात प्रतिकात्मक रेल्वे इंजिन दिसून आलं. हे इंजिन कोणी कोणाला भेट दिलं हे समजू शकलं नसलं तरी मनसेचं रेल्वे इंजिन आगामी काळात गती धरणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
नुकत्याच झालेल्या गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली होती. त्याचवेळी त्यांनी भाजपचं कौतुक केलं होतं. उत्तर प्रदेशात भाजपने विकास केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. तेव्हापासून मनसे आणि भाजप युती होणार अशा चर्चांना आणखी उधाण आलं होतं.
मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री @RajThackeray यांच्या बरोबर भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. pic.twitter.com/zvaof4RHck
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) April 9, 2022
आजच्या भेटीच्या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि भाजपनेत्या शायना एनसी देखील उपस्थित होत्या.