David Warner Retirement : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने नववर्षानिमित्त चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने कसोटीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकतो असेही वॉर्नरने म्हटले आहे.
डेव्हिड वॉर्नरने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सिडनी येथे 3 जानेवारीपासून पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर तो या फॉरमॅटला अलविदा करेल. आता तो म्हणाला की, कसोटीसोबतच तो त्याच दिवशी एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होणार आहे.
मात्र, डेव्हिड वॉर्नर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळताना दिसणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पाकिस्तानच्या भूमीवर आयोजित केली जाणार आहे. डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, जर ऑस्ट्रेलियाला माझी गरज असेल तर मी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असेल. पुढे वॉर्नर म्हणाला की, यावर्षी भारतामध्ये विश्वचषक जिंकणे ही एक मोठी उपलब्धी आहे. वॉर्नर म्हणाला की, त्याला जगभरातील इतर लीगमध्ये खेळायचे आहे. त्याच्या निवृत्तीमुळे वनडे संघाला पुढे जाण्यास मदत होईल. ऑस्ट्रेलियन सलामीवीर म्हणाला की, जर तो दोन वर्षे चांगला खेळत राहिला आणि संघाला त्याची गरज असेल तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
तसेच डेव्हिड वॉर्नरने सांगितले की, क्रिकेटला अलविदा केल्यानंतर तो पुढे काय करणार? डेव्हिड वॉर्नरच्या मते, तो फॉक्स चॅनलच्या कॉमेंट्री टीमचा एक भाग बनला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील वर्षी कसोटी मालिका होणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नर कॉमेंट्री करताना दिसणार आहे.
डेव्हिड वॉर्नरची कारकीर्द…
111 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नरने 161 एकदिवसीय आणि 99 टी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय डेव्हिड वॉर्नरने आयपीएलचे 176 सामने खेळले आहेत. डेव्हिड वॉर्नरने कसोटी सामन्यात 44.59 च्या सरासरीने 8 हजार 695 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या वनडे करिअरमध्ये 6 हजार 932 धावा आहेत. तिकडे डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी टी-20 सामन्यात 2 हजार 894 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने आयपीएलच्या 176 सामन्यांमध्ये 6 हजार 397 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाला दोनदा विश्वविजेते बनवण्यात महत्त्वाची भूमिका
वॉर्नर दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राहिला आहे. आॅस्ट्रेलियानं 2015 मध्ये घरच्या मैदानावर आणि 2023 मध्ये पुन्हा भारतात विजेतेपद पटकावले. वाॅर्नरने 2015 विश्वचषकाच्या आठ डावात 49.28 च्या सरासरीने आणि 120.20 च्या स्ट्राईक रेटने 345 धावा केल्या. त्याने 1 शतक झळकावले होते. तो या स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने 11 सामन्यांमध्ये 48.63 च्या सरासरीने आणि 108.29 च्या स्ट्राइक रेटने 535 धावा केल्या. तो या स्पर्धेत कांगारू संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने विश्वचषकात दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली होती.