Nasser Hussain : नवीन वर्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी आयसीसीने इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नासिर हुसेनला आगामी वर्षात सर्वाधिक यश मिळवणाऱ्या संभाव्य क्रिकेटपटूचे नाव विचारण्यात आले आहे, येथे हुसैन त्याच्या उत्तरात दोन फलंदाजांची नावे घेताना दिसत आहे. नासिर हुसेनने विराट कोहलीला आपल्या पसंतीत प्रथम ठेवले आहे आणि बाबर आझम हा त्याचा दुसरा पर्याय आहे.
नासिर हुसैन सांगतो की, ‘माझी पहिली पसंती एक मेगास्टार आहे आणि यात शंका नाही. तो म्हणजे विराट कोहली. 2023 हे वर्ष त्याच्यासाठी अप्रतिम ठरले आणि विश्वचषकही अप्रतिम ठरला. एकापाठोपाठ एक अशा अनेक विक्रमी खेळी करताना तो किती चांगली फलंदाजी करतोय यावर लक्ष द्यायला आपण विसरलो. तांत्रिकदृष्ट्या, मी विराट कोहलीची अशी फलंदाजी यापूर्वी कधीही पाहिली नाही. त्याची मानसिक स्थिती चांगली असून त्याचा खेळ अतिशय व्यवस्थित दिसतो.
बाबर आझमबाबत नासिर हुसैन काय म्हणाले?
नासिर हुसेन म्हणतो, ‘पुढे तोच आहे ज्याची तुलना नेहमीच विराटशी केली जाते. बाबर आझम. मला वाटते की हे वर्ष त्याच्यासाठी आणि पाकिस्तान संघासाठी खूप मोठे असणार आहे. त्याने कर्णधारपद सोडले आहे, याचा अर्थ त्याच्या खांद्यावरून मोठे ओझे हटले आहे. आता तो पाकिस्तानसाठी खूप धावा करू शकतो. त्याच्या बॅटमधून धावा निघणे पाकिस्तानसाठी खूप गरजेचे आहे. कॅरेबियनमध्ये टी-20 विश्वचषक आहे. गेल्या वेळीही पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला होता. आता त्यांना त्यांच्या माजी कर्णधाराच्या खऱ्या कामगिरीची गरज असेल.
View this post on Instagram
असं होतं विराट आणि बाबरचं 2023चं वर्ष …
विराट कोहलीने यावर्षी 35 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2 हजार 048 धावा केल्या आहेत. या वर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने या वर्षीही एकूण 8 शतके झळकावली आहेत, जी 2023 मध्ये कोणत्याही फलंदाजाने झळकावलेली सर्वाधिक शतके आहेत. दुसरीकडे बाबर आझमसाठी हे वर्ष फारसे चांगले राहिले नाही. बाबरला यावर्षी 35 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 1 हजार 399 धावा करता आल्या आहेत. या वर्षात त्याने तीन शतके झळकावली आहेत.