सिडनी :– तीन कसोटी सामन्यांची मालिका ३-० अशी निर्विवाद जिंकत यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला व्हाइटवॉश दिला. पहिले दोन्ही सामने जिंकल्यावर या कसोटीतही त्यांनी एकतर्फी वर्चस्व राखले. या मालिका विजयानंतर त्यांचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटला अलविदा केले. तो बाद होऊन परतत असताना दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. तसेच प्रेक्षकांनीही त्याचे टाळ्यांच्या गरजात कौतुक केले.
या कसोटीत पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ३१३ धावा केल्या होत्या व ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २९९ धावांवर रोखत महत्वपूर्ण १४ धावांची आघाडीही घेतली होती. मात्र, दुसऱ्या डावात त्यांची फलंदाजी कोसळली व त्यांचा डाव अवघ्या ११५ धावांवर संपला. यानंतर ऑस्ट्रेलियाने २ गडी गमावून १३० धावा करत हा सामना ८ गडी राखून जिंकला. तसेच ही मालिकाही ३-० अशी निर्विवाद जिंकली.
Australia win the third Test by eight wickets.#AUSvPAK pic.twitter.com/Bwr4c9ohfo
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 6, 2024
ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर ५७ धावा करून बाद झाला. हा त्याचा कारकीर्दीतील अखेरचा डाव होता व त्याने अर्धशतक फटकावत आपली निवृत्तीही यशस्वी करुन दाखवली. मार्नस बेलुशेनने नाबाद ६२ धावांची खेळी केली. त्याने वॉर्नरसह शतकी भागीदारी केली व संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्टीव्ह स्मिथ ४ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून साजीद खानने २ बळी घेतले. पाकिस्तानचा अमर जमाल सामन्याचा तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स मालिकेचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक – पाकिस्तान पहिला डाव – सर्वबाद ३१३ धावा. ऑस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद २९९ धावा. पाकिस्तान दुसरा डाव – ४३.१ षटकांत सर्वबाद ११५ धावा. (सयाम आयुब ३३, महंमद रिझवान २८, बाबर आझम २३, जोश हेझलवूड ४-१६, नाथन लियॉन ३-३६). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – २५.५ षटकांत २ बाद १३० धावा. (डेव्हिड वॉर्नर ५७, मार्नस लेबुशेन नाबाद ६२, स्टीव्ह स्मिथ नाबाद ४, साजीद खान २-४९).
डेव्हिड वॉर्नरचा कसोटीला रामराम
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्दीला पूर्णविराम दिला. त्याने या मालिकेनंतर निवृत्त होत असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्याने १२ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत ११२ सामन्यांत २०५ डाव खेळताना ८७८६ धावा केल्या आहेत. त्यात ३३५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच त्याने एकूण २६ शतके फटकावली सून त्यात ३ द्विशतकी खेळींचाही समावेश आहे. त्याने ३७ अर्धशतकेही फटकावली आहेत.