Gangster Goldie Brar declared terrorist – गँगस्टर गोल्डी ब्रारला केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी दहशतवादी घोषित केले आहे. याआधी केंद्र सरकारने लखबीर सिंग लांडा यालाही दहशतवादी घोषित केले आहे. हे दोघेही कॅनडामध्ये लपले आहेत. पंजाबमधील खंडणी आणि सीमेपलीकडून शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांच्या तस्करीतही त्यांचा सहभाग आहे. गोल्डी ब्रार हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खास सहकारी आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.
रेड कॉर्नर नोटीस जारी-
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा आरोप असलेला ब्रार कॅनडामध्ये लपला आहे. ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्रांची तस्करी असे सुमारे 13 गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी गोल्डी ब्रारच्या घरावर छापा टाकला होता. त्याचवेळी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ब्रारशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवरही छापे टाकले.
गोल्डी ब्रार कॅनडाला स्टुडंट व्हिसावर शिकण्यासाठी गेला होता. तो भारतातील अनेक नेत्यांना धमकीचे फोन करून, खंडणीची मागणी करण्यासाठी आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हत्येचे दावे पोस्ट करण्यासाठी देखील ओळखला जातो.