नवी दिल्ली – 1993च्या मुंबइर बॉम्बस्फोट कटाचा सूत्रधार आणि भारताला हवा असणारा सर्वात महत्त्वाचा गुन्हेगार दाऊद इब्राहिम हा डोमिनिकाचा रहिवासी असल्याचे त्या देशाने रविवारी नाकारले. त्याच्याकडे डोमिनिका कॉमनवेल्थचा पासपोर्ट असल्याचेही नाकारले आहे.
या बाबात डोमिनिका कॉमनवेल्थ सरकारने एक निवेदन रविवारी जारी केले. त्यात ते म्हणतात, दाऊद हा सध्याच नव्हे तर कधीही या देशाचा नागरिक नव्हता. देशात केलेल्या गुंतवणुकीच्या कारणाने अथवा अन्य कोणत्याही कारणाने त्याला नागरिकत्व दिलेले नाही. त्या संदर्भात आलेल्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
गुंतवणूक करणाऱ्या करणाऱ्यांना नागरिकत्व बहाल करण्याची प्रक्रिया इंग्लड आणि अमेरिकेतील दोन नामवंत कंपन्यांमार्फत पार पाडली जाते. त्यावर सरकारची काटेकोर नजर असते.
नामांकित आणि विश्वासार्ह व्यक्तींनाच त्यात नागरीकत्व मिळते. त्यांनी अत्यंत विश्वासार्ह पध्दतीने असे नागरिकत्व देताना देशातील नागरिकांना कोणताही धोका होणार नाही याची आम्ही काळजी घेतो, असे त्यात म्हटले आहे.
पाकिस्तान सरकारने सुरवातीला त्यांच्या देशातील दहशतवाद्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिले. त्यात दाऊदच्या नावाचा समावेश होता. दाऊदकडे सध्या भारत, पाकिस्तान, दुबई आणि डोमानिकाचे पासपोर्ट असल्याचा दावा भारतीय यंत्रणांनी केला होता.