लॉकडाऊनमधला निम्मा पगार पेट्रोलवर खर्च
पुणे – पुणे, पिंपरी चिंचवडसह लोणावळ्यापर्यंत आणि मुंबईत नोकरीसाठी दररोज अप-डाऊन करणारे हजारो नोकदार सध्या, रेल्वे बंद असताना करोनाच्या स्थितीतही नोकरी टिकविण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. लॉकडाऊनमुळे निम्मा अर्धा मिळणारा पगारही पेट्रोलवर खर्च होत असल्याने पोराबाळांसह उपाशी राहण्याची वेळ चाकरमान्यांवर आली आहे, अशी स्थिती असतानाही दौंड-पुणे आणि लोणावळा-पुणे रेल्वेसह मुंबईकडे जाणाऱ्या लोकल पॅसेंजर बंद आहेत. ही सेवा कधी सुरू होते, याकडे चाकरमान्यांचे डोळे लागले आहेत.
राज्यात एसटी सेवा आणि शहरात पीएमपी सुरू झाल्यानंतर रेल्वे सेवाही सुरू होईल, अशी आशा नोकदारांना होती. शिवाय, अनलॉक 2 आणि 3 मध्ये शासकीय तसेच खासगी कार्यालये सुरू झाल्यानंतरही रेल्वे सुरू झाली नाही. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून नोकदारांना दुचाकीसह खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. पगार 15 हजार आणि पेट्रोलवर 10 ते 12 हजार खर्च होत असल्याने चाकरमान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
करोनाच्या काळात दुसरी नोकरी मिळणे अवघड होईल. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल या आशेने चाकरमाने दुचाकीसह खासगी वाहनांनी नोकरीसाठी अगदी लोणावळ्यापर्यंत धावपळ करीत आहेत. दौंड-पुणे, लोणावळा-पुणे, पुणे-मुंबई या मार्गावरील रेल्वे सेवा अद्यापही बंद आहे.
पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या सुरू झाल्या असल्या तरी आजही चाकरमान्यांसाठी गरजेच्या असलेल्या रेल्वे गाड्या सुरू झालेल्या नाहीत. यामुळे बाहेरील शहरांतून पुण्यात येणाऱ्या तसेच पुण्यातून बाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. रेल्वे बंद असल्याने खासगी वाहनाने नोकरीचे ठिकाण गाठावे लागत आहे.
बारामती-दौंड-पुणेदरम्यान दररोज सुमारे 10 ते 15 हजार प्रवासी, तर पुणे-लोणावळा दरम्यान दररोज दीड लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करायचे. यातील निम्म्याहून अधिक दररोजचे अप-डाऊन करणारे होते. आजघडीला पुणे शहरात दौंड, लोणावळा, यवत, केडगाव आदी ठिकाणांहून स्वतःच्या दुचाकी किंवा अन्य खासगी वाहनाने येणाऱ्यांची संख्या सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे.
पुण्यातील एका बॅंकेत देखभाल-दुरुस्ती विभागात कामाला असून केडगाव-स्वारगेट-केडगाव असे दोन्ही वेळचे मिळून 130 किलोमीटरचे अंतर दुचाकीवर पार करतो. दररोज, 300 रुपयांचे पेट्रोल लागत असून महिन्याकाठी 9 हजार रुपये खर्च होतात. मला, 15 हजार पगार असून केवळ नोकरी टिकवण्यासाठी सोलापूर महामार्गाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
– बबन ठेबरे, नोकरदार
दौंड-पुणे रेल्वे प्रवासाकरिता 270 रुपयांचा मासिक पास लागायचा. आता, याच प्रवासाकरिता मला दुचाकीवरून पेट्रोलसाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. पुण्यातील कॅम्प भागातील एका राष्ट्रीयकृत बॅंकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सध्या, पावसाळ्याचे दिवस असले तरी सोलापूर महामार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. प्रवासी संघटनांनी दौंड-पुणे रेल्वे सुरू करण्याबाबत मागणी केली असून ती मान्य झाली नाही.
– दिलीप होळकर, नोकरदार