इस्लामाबाद: 1993 मधील मुंबईत साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यालाही करोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. दाऊदसोबतच त्याच्या पत्नीलाही करोना संसर्ग झाल्याचे समजते. पाकिस्तानमधील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले जात आहे. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
दाऊद आणि त्याची पत्नी मेहजबीन हिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचा उल्लेख आहे. दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती ब्रिटनमधील एका न्यायालयाला मागील वर्षी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली होती.
मात्र आता दाऊदला करोना झाला असून त्याच्यावर कराचीमधील लष्करी रुग्णालयामध्येच उपचार सुरू असल्याचे सीएनएनचे म्हणणे आहे. दहा दिवसांपूर्वीच दाऊद लष्कर ए तोयबाच्या काही लोकांना भेटल्याचेही सांगण्यात येत आहे. तो काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमधून कराचीमध्ये दाखल झाल्याचे समजते.
पाकिस्तानची गोची
दाऊदला करोना झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता पाकिस्तानने या वृत्ताला दुजोरा दिल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा विरोध सहन करावा लागणार आहे. दाऊदला भेटलेल्या व्यक्तींचे करोना चाचणीचे निकाल सकारात्मक आले तर पाकिस्तान मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पाकिस्तानला दाऊद आणि त्याची पत्नी कराचीमध्ये उपचार घेत असल्याचे सांगावे लागले. त्यानंतर राजकीय दबाव वापरून दाऊदला ताब्यात घेण्यासंदर्भात भारत हलचाली सुरू करू शकतो, असे सांगण्यात येत आहे.