वाई – येथील एमआयडीसीतील उद्योजक विजय अंबिके यांनी टाकाऊ वस्तूंपासून सॅनिटायझर यंत्रणा बनविली आहे. गुंडेवाडी (ता. वाई) येथील रहिवासी विजय अंबिके यांनी कस्तुरी एंटरप्रायझेस या उद्योगाचे ठिकाणी कामगारांना करोना विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ही यंत्रणा बनवली आहे.
कामगारांना दिवसभरांतून तीन- चार वेळा हातांना सॅनिटायझरने हात धुण्यासाठी त्यांनी अफलातून युक्ती लढविली आहे. कस्तुरी एंटरप्रायझेसमध्ये सध्या आठ ते दहा कामगार कामास आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी विजय यांनी झिरो बजेट सॅनिटायरझर यंत्रणा शोधून काढली आहे. विजय यांनी बी. एस्सी. पदवी मिळविली आहे. त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुणे येथे औषधे मार्केटिंग उद्योगात नोकरी केली. गेल्या तीन चार वर्षांपासून ते वाई एमआयडीसीमध्ये स्वतःचा व्यवसाय करीत आहेत.
कंपनीतील कामगारांच्या सोयीसाठी अंबिके यांनी उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून ही सॅनिटायझर यंत्रणा तयार केली. सध्या बाजारात तीन हजार रूपयांपासून दहा हजार रूपयांपर्यंत सॅनिटायझर यंत्रे उपलब्ध आहेत. मात्र, अंबिके यांनी अत्यंत कौशल्याने उपलब्ध साहित्यामध्ये निर्माण केलेली झिरो बजेट सॅनिटायझर यंत्रणा सध्या औत्सुक्याचा विषय बनली आहे.