पुणे : जीवनात यशस्वी होण्यासाठी सभोवतालचे वातावरण अनुकूल असावे लागते असे काही नाही तर जिद्दीने कठोर अभ्यास केल्यास यश हमखास मिळते आणि याचे ज्वलंत उदाहरण पर्वती दर्शन मध्ये राहणाऱ्या मोनिका कांबळे या युवतीने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.
दत्तवाडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षण देविदास घेवारे यांनी राज्यसेवा परीक्षेत यश मिळवून उपशिक्षण अधिकारी झालेल्या कुमारी मोनिका कांबळे या युवतीचा पेढे भरवून सत्कार केला आहे. त्या प्रसंगी त्यांनी सांगितले की, मला जास्त अभिमान आहे की, दत्तवाडी पोलिस स्टेशन हद्दीत पर्वती दर्शन सारख्या झोपडपट्टी मधून एक विद्यार्थिनी राज्यसेवेच्या स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होते आणि उपशिक्षण अधिकारी होते ज्या भागातील लोकवस्ती सुधारण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे अशा भागातून मोनिका सारखी एक हुशार विद्यार्थी त्याच क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी होते हा सर्वांसाठी गौरवस्पद क्षण आहे.
मोनिका कांबळे हिचे वडील पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात सेवेत आहेत. तिने या पूर्वी २०१८ मध्ये कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी व २०१९मध्ये राज्यविक्री कर अधिकारी म्हणून परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सुरवातीला तिने खंडाळा येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे त्यानंतर गेल्या १० महिन्या पासून ती राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून पुण्यात कार्यरत आहे.
कोरोना महामारीमध्ये तिने रेशन दुकानात अधिकारी म्हणून गोर गरिबांना धान्य योग्य रीतीने मिळते का?योग्य धान्यसाठा दुकानदार यांच्या कडे उपलब्ध आहे का? या विषयी अत्यंत काळजीपूर्वक काम केले आहे. तिला पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन जिल्हाधिकारी व्हायचे आहे त्या साठी तिची आतापासून तयारी सूरु आहे.