Taj Hotels – टाटा समूहाची मालकी असलेल्या ताज हॉटेलचा (Taj Hotels) डाटा लीक झाला आहे. वृत्तानुसार यामध्ये सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 15 लाख ग्राहकांचा डाटा लीक झाला आहे. या संबंधीचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थने दिले आहे.
या प्रकरणात कंपनीकडून 5,000 डॉलरची खंडणीही मागण्यात आली आहे. ताज समूह चालवणाऱ्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) नेही या घटनेची पुष्टी करताना त्यांची चौकशी चालू असल्याचे म्हटले आहे.
इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या प्रवक्त्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ताज हॉटेलच्या काही ग्राहकांचा डाटा ताब्यात असल्याचा दावा खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने केला आहे.
हॅकरचा दावा आहे की, त्याच्याकडे 2014 ते 2020 या कालावधीतील डाटा आहे आणि तो आतापर्यंत कुठेही सार्वजनिक करण्यात आलेला नाही. व्यक्तीने त्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ एक नमुना देखील जाहीर केला आहे.
या डाटा लीक प्रकरणात, कंपनीकडून 5,000 डॉलरची खंडणी देखील मागितली गेली आहे. लीक झालेल्या डेटामध्ये ग्राहकांचा डाटा, मेंबरशिप आयडी, मोबाईल नंबर आणि इतर वैयक्तिक माहितीचा समावेश असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
या विषयी कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या दाव्याची चौकशी सुरु आहे. तसेच इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) ला देखील या डाटा लीकची माहिती देण्यात आली आहे. ते देखील या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डाटा लीक करणाऱ्या व्यक्तीने कंपनीसमोर तीन अटी देखील ठेवल्या आहेत.
खंडणी मागणाऱ्याच्या अटी खालील प्रमाणे –
– कोणत्याही प्रकारच्या संभाषणासाठी मध्यस्थ असावा.
– तुकड्यांमध्ये डाटा शोधला जाणार नाही. संपूर्ण डाटाबद्दल एकदाच चर्चा होईल.
– डाटाचा कोणताही नमुना दिला जाणार नाही.