लंडन – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरेल मिशेल याने अनोखा विक्रम साकार केला आहे. त्याने तिसऱ्या कसोटीतही शतकी खेळी करत या दौऱ्यातील आपले सलग तिसरे शतक आहे. त्याने लॉर्डसवरील पहिल्या कसोटीत 108 तर ट्रेंट ब्रिज कसोटीत 190 धावांची खेळी केली होती.
याचबरोबर मिशेल हा न्यूझीलंडचा 73 वर्षानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 400 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. मिशेलने न्यूझीलंडचे माजी फलंदाज बर्ट सटक्लिफ यांना मागे टाकले. त्यांनी 1949 साली इंग्लंड दौऱ्यावर सात डावात 451 धावा केल्या होत्या. या दौऱ्यात सटक्लिफ यांनी एक शतक आणि चार अर्धशतके फटकावली होती.
मिशेलने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 109 धावांची खेळी केली व या अनोख्या कामगिरीची नोंद केली. तसेच मिशेल इंग्लंडमध्ये तीन शतके करणारा जगातील चौथा फलंदाज ठरला.यापूर्वी महंमद युसूफने 2006 साली, स्टीव्ह स्मिथने 2019 सालीतर राहुल द्रविडने दोन वेळा इंग्लंडमध्ये तीन शतके फटकावण्याचा पराक्रम केला आहे.