इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिका
मॅंचेस्टर – वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 369 धावा केल्या. मधल्या फळीत घसरगुंडी उडाल्यानंतर तळातील फलंदाजांनी केलेल्या आश्वासक खेळामुळे त्यांचा डाव सावरला.
शुक्रवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान इंग्लंडने दिवसअखेर 4 गडी गमावून 258 धावा केल्या होत्या. त्यात शनिवारी 111 धावांची भर घातल्यावर त्यांचा डाव संपुष्टात आला. 91 धावांवर नाबाद असलेल्या ओली पोप त्याच धावसंख्येवर परतला व त्याचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. तसेच जोस बटलर 67 धावांवर परतला.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोश याने अत्यंत भेदक गोलंदाजी केली व त्याच्यासमोर इंग्लंडच्या मधल्या फळीची घसरगुंडी उडाली. त्यानंतर मात्र, स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडला. ब्रॉड 62 धावा काढून बाद झाला. त्याने 45 चेंडूत 9 चौकार व 1 षटकार फटकावत वेस्ट इंडिजवर वर्चस्व राखले. या सामन्यात इंग्लंडचा संघ 300 धावा देखील पूर्ण करेल का, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, ब्रॉडने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे त्यांनी मोठा पल्ला गाठला.
वेस्ट इंडिजकडून केमार रोशने सर्वाधिक 4 गडी बाद केले. त्याला सुरेख साथ देताना रॉस्टन चेस व शेनन गॅब्रियल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. आता वेस्ट इंडिजला या निर्णायक कसोटीत विजय मिळवत ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्यासाठी मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव – 111.5 षटकांत सर्वबाद 369. (ओली पोप 91, जोस बटवर 67).
वेस्ट इंडिज पहिला डाव – 47.1 षटकांत 6 बाद 137. (जॉन कॅम्बेल 32, ब्लॅकवूड 26).