लीड्स – जागतिक फुटबॉलमध्ये चाहत्यांमध्ये भांडणाचे प्रकार नवे नाहीत मात्र, अशीच हाणामारी क्रिकेटच्या एकाच संघाच्या चाहत्यांमध्ये झाली तर आश्चर्यच वाटते. मात्र, अशी सामन्याला गालबोट लावणारी घटना इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान लीड्सच्या मैदानावर घडली.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात चाहत्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. इंग्लंड संघाच्या चाहत्यांमध्ये ही घटना घडल्यामुळे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने चिंता व्यक्त केली आहे. सामना पाहण्यासाठी आलेल्यांमधील काही प्रेक्षक मद्याच्या अंमलाखाली होते. सामना सुरू असताना अचानक काही चाहत्यांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. अशरक्ष: लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. शेवटी पोलिसांना याप्रकरणी मध्यस्थी करावी लागली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Gazza getting rowdy at headingley pic.twitter.com/ClxT7zkTRn
— Alex Buxton (@buxton_13) June 26, 2022
हेडिंग्ले कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाने शानदार खेळ करत न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच इंग्लंडने न्यूझीलंडला तीन सामन्यांच्या मालिकेत व्हाईट वॉश दिला. ज्यावेळी मैदानावर इंग्लंडचे खेळाडू शानदार खेळ करत होते त्याचवेळी चाहते मात्र, आपापसात हाणामारी करण्यात गर्क होते. आता या घटनेमुळे इंग्लंड मंडळाला आगामी भारताविरुद्धच्या कसोटीत काय होणार याची चिंता लागली आहे.