पुणे – नवरात्रोत्सवासाठी यंदा फुलबाजार फुलला आहे. पाऊस कमी झाल्यामुळे फुलांचे जास्त झालेले उत्पादन, पितृपंधरवड्यात नसलेली मागणी आणि नवरात्रोत्सवात भाव मिळेल, या अपेक्षेने राखीव ठेवलेला माल शनिवारी (दि. 14) शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात विक्रीसाठी आणला. परिणामी, नेहमीच्या तुलनेत बाजारात फुलांची विक्रमी तिप्पट आवक झाली. त्यामुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत फुलांचे भाव निम्म्याने घटले.
झेंडू, शेवंती या दोन्ही फुलांची सर्वाधिक आवक नोंदवली गेली. दोन दिवसांपूर्वी घाऊक बाजारात झेंडूला किलोला 30 ते 50 रुपये भाव होता. तो शनिवारी 10 ते 20 रुपये मिळाला. तर सेंट व्हाइट शेवंतीला दोन दिवसांपूर्वी किलोला 140 रुपये भाव मिळाला होता. शनिवारी शेवंतीची 100 रुपये किलोने विक्री झाली.
व्यापारी सागर भोसले म्हणाले, “यंदा झेंडूचे उत्पादन जास्त झाले आहे. त्यामुळे पुणे विभागासह राज्याच्या विविध भाग आणि कर्नाटक येथून झेंडूची आवक होत आहे. सर्वाधिक आवक सोलापूर जिल्ह्यातून झाली आहे. तर शेवंतीची आवक यवत, माळशिरस भागासह शिरूर तालुक्यांतून झाली आहे.’
नवरात्रौत्सवासाठी झेंडू आणि सेंट व्हाइट शेवंतीला सर्वाधिक मागणी आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे दोन्ही फुलांचे उत्पादन जास्त झाले आहे. त्यामुळे आवक जास्त झाली आहे. दोन्ही फुलांच्या भाव घटले आहेत. येत्या काही दिवसात फुलांची मागणी आणि भावातही वाढ होईल. – अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशन