पिंपरी (प्रतिनिधी) – कुदळवाडी येथे बहुतांशी भागात वीजवाहिन्या पोलवरून टाकलेल्या आहेत. परंतु सध्या कुदळवाडी-जाधववाडी मार्गावरील वीजतारा जुन्या झाल्या आहेत. वीजतारांना झोळ आला आहे. त्यामुळे मोठी वाहने या तारांना अडकून तारा तुटण्याचे प्रकार यापूर्वी बऱ्याचवेळा घडले आहेत. महावितरणकडे येथील वीजवाहिनी भूमिगत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु अद्याप याला मुहूर्त मिळत नसल्याने येथील नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी मोठ्या गाडीत मशीन चालवले होते. वाहनचालकाला महावितरणच्या वीज तारांचा अंदाज न आल्याने अर्धा ते पाऊणतास ते अवजड वाहन रस्त्यात उभा होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच ही लोखंडी मशीनचा या तारांना स्पर्श झाला असता तर तारा तुटून तसेच वाहनचालकाला अपघात झाला असता. या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवजड आणि जास्त उंचीच्या वाहनांची वर्दळ असते.
मोठ्या गाड्या प्लॅस्टिक, भंगार तसेच बॅलर, पुट्टे आदी वस्तूंची येथून दिवस-रात्र वाहतूक सुरू असते. बहुतांश वेळा पुट्टा, भंगाराच्या गाड्या आपल्या क्षमतेपेक्षा अधिक माल भरून वाहतूक करतात. त्यामुळे वाहनचालकांना महावितरणच्या तारांचा अंदाज न आल्याने यापूर्वी अनेकवेळा येथील तारा तुटल्या आहेत. गुरुवारी देखील अशीच एक मोठे वाहन या तारांना अडकून पडले होते. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्याला बोलावून येथील विद्युत पुरवठा खंडित करून गाडी बाहेर काढण्यात आली. अशा घटना सातत्याने या परिसरात घडत आहेत. त्यामुळे येथील वीजवाहिनी भूमिगत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चिखली, कुदळवाडी येथील मोरे पाटील चौक ते जाधववाडीकडे जाणाऱ्या मार्गावर महावितरणचे विद्युत खांब आहेत. या विद्युत वाहिनीला मोठ्या प्रमाणावर झोळ पडला असून येथे वारंवार तारा तुटण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु महावितरणकडे आर्थिक तरतूद नसल्याने हे काम रखडले आहे. एकंदरीत महावितरणचा कारभार नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारा आहे. यापूर्वी कुदळवाडी येथील लोटस हॉस्पिट, सागर हॉटेल तसेच आयुष मेडिकलजवळ विद्युत तारा तुटल्याच्या घटना घडल्या आहेत.
जाधववाडी, कुदळवाडी, राजेशिवाजीनगर परिसरामध्ये बहुतांश भागात भूमिगत विद्युतवाहिनीची कामे बाकी आहेत. हा परिसर दुकाने, घरे यांच्यामुळे गजबजलेला असतो. लहान मुले खेळत असतात, दुकाने असल्यामुळे कायम वर्दळ असते. वीज वाहिनी तुटून अंगावर पडल्यास दुर्घटना घडू शकते.
उंच वाहने अडकतात तारांमध्ये
कुदळवाडी येथे विविध लहान मोठे व्यवसाय आहेत. तसेच भंगार व पुठ्ठे, प्लॅस्टिक कचरा खरेदी विक्री केला जातो. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक माल भरून आणलेल्या वाहनांचा विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन नेहमीच स्पार्किंग होते. तर काही वेळा रस्त्याच्या कडेलाच असलेल्या रोहित्राजवळ विजेचे गोळे पडून विद्युतपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या बजेटअभावी सर्व कामे रखडली आहेत. कुदळवाडीतील विद्युत वाहिनी भूमिगत करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात येथील वीजवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्या नवीन टाकण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्यालादेखील निधी मिळालेला नाही. त्यामुळे काम रखडले आहे.
– रमेश सूळ, महावितरण अधिकारी.