मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate)म्हणजेच ईडीचं (ED)पथक सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं आहे. आज सकाळीच ईडीचे काही अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत काही सुरक्षा रक्षक देखील आले असून संजय राऊतांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवत घरात इतरांना प्रवेश देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate)म्हणजेच ईडी कडून चौकशीसाठी नोटीस बजावली होती. परंतु राऊत यांनी संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून ईडीच्या चौकशीला सामोरे न जाता त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. आज सकाळी अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या घरी ईडी पथकाची हि चौकशी किती काळ चालेल हे अद्याप सांगता येत नाही.