सातारा – शेंद्रे (ता. सातारा) येथील मंगल कार्यालयातून अनोळखी युवतीने 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व एक लाखांची रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना दि. 4 रोजी घडली असून याप्रकरणी सोनल राहुल पवार (वय 34, रा. शाहूनगर, सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. विवाह कार्य असल्याने लग्नामध्ये गर्दी होती.
याच गर्दीचा फायदा घेवून अनोळखी युवतीने नवऱ्या मुलाच्या खोलीमधून 30 हजाराचे सोन्याचे पदक, 15 हजाराचे झुमके, 15 हजाराची सोन्याची अंगठी, 30 हजारांची सोन्याची चेन, 15 हजारांचे कानातले वेल, 15 हजाराचे कानातले टॉप, 15 हजाराची अंगठी, चांदीचे करंडे, चांदीची गणपतीची मूर्ती व आहेराचे सुमारे रोख एक लाख रुपये असा मुद्देमाल चोरुन नेला. या घटनेने खळबळ उडाली असून संशयित अनोळखी युवती असल्याचे समोर आले आहे. याबाबत सातारा तालुका पोलिस तपास करत आहेत.