– संतोष वळसे पाटील
मंचर -आंबेगाव तालुक्यातील 21 ग्रामपंचायती पैकी 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना रंगत आली आहे. निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, सध्या प्रत्येक वॉर्डवाईज जेवणावळीला ऊत आल्याने हॉटेल व्यवसायिकांना ऐन मार्गशीष महिन्यात सुगीचे दिवस आले आहे.
आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार चालू असल्याने मांसाहार पार्ट्या जोरात सुरू आहेत. बहुतेक ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खुश करण्यासाठी मांसाहारी, तसेच शाकाहारी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. बहुतेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढतीचा सामना रंगत आहे. तालुक्यातील 16 गावांमध्ये दोन-तीन पॅनल तयार झाले आहेत.
या पॅनलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खुश करण्यासाठी बहुतेक ठिकाणी मांसाहारी, तर काही ठिकाणी शाकाहारी पार्ट्यांचे आयोजन होत आहेत. कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ढाब्यांवर आणि व्हेज हॉटेलवर जेवण्यासाठी उमेदवार गाड्यांच्या गाड्या भरून घेऊन येत असल्याने हॉटेल व्यवसायिकांना ऐन मार्गशीष महिन्यात सुगीचे दिवस आले आहे.
पुढील दोन दिवसांत प्रचाराला मोठ्या प्रमाणात जोरदार रंगत चढणार असून कार्यकर्ते आपल्या नेत्यांचा गवगवा करून प्रचारासाठी घरोघर जाऊन मोठ्या शक्ती प्रदर्शनांसह मतदारांना आपले चिन्ह पटवून देत आहे. मतदारांना जेवणाचे आमिष दाखवून खुश करण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामपंचायत पातळीवर निवडणुकीची रणधुमाळी चांगली सुरु झाल्याने गावकी व भावकीत निवडणुकीमुळे कायमस्वरूपी वाद पडण्याची शक्यता जास्त असते. ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावपातळीवर जास्त करून गावकी आणि भावकीतच चालू आहे.
ऐन थंडीत मतदारांना खुश करण्यासाठी मांसाहारी पार्टीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होत आहे. चिकन स्वस्त असल्याने तसेच मच्छींच्या पार्ट्यांना ऊत आला आहे, तर काही ठिकाणी प्रचारासाठी बरोबर फिरणाऱ्या कार्येकर्त्यांना खुश करण्यासाठी मटण पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे.
सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हाट्सऍप, स्टेटसद्वारे उमेदवारांच्या प्रचाराला रंगत चढली आहे. वाडी वस्तीवर घोंगडी बैठकांना जोर आला आहे. उमेदवारांनी बॅनरद्वारे आणि डिजिटल गाणी बनवून गाडीद्वारे प्रचार सुरू केला आहे. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन परिपत्रक आणि स्टिकर चिटकून प्रचाराला सुरूवात केली आहे.
रविवारी मतदान
सदस्य पदाच्या 76 जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरीत 151 जागांसाठी 259 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत एकूण मतदार केंद्रांची संख्या 61 असणार असून, त्यात महिला मतदार 20 हजार 723, पुरुष मतदार 21 हहजार 528 असे एकूण मतदार 42 हजार 251 मतदार आहेत. मतदान 18 डिसेंबर सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 यावेळेत होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.