पुणे – महागाई, काळेधंदे, गुन्हेगारीच्या विरोधात दलित पॅंथरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. हातात बॅनर, झेंडे आणि घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परीसर दणाणून सोडला.
पुणे शहरातील स्वारगेट, मार्केटयार्ड आणि भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, स्त्री अत्याचार, काळेधंदे, गुन्हेगारीला आळा घालावा म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी दलित पॅंथरचे प्रकाश साळवे पुणे शहराध्यक्ष, विशाल खिलारे पुणे जिल्हाध्यक्ष, सुखदेव सोनवणे, विशाल खिलारे, विठ्ठल केदारी, विक्रम कांबळे, राजेश गवळी, राहुल सोनवणे, आरती बाराचे आदी उपस्थित होते.
प्रकाश साळवे यावेळी बोलताना म्हणाले की, पुणे शहरातील स्वारगेट मार्केटयार्ड आणि भारती विद्यापीठ परिसरात काळेधंदे, सट्टा, जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. स्वारगेट परिसरात पान टपरीवर बेकायदेशीर गुटखा विक्री , स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड शेजारी रात्री उशीरापर्यंत अंडाभुर्जीच्या बेकायदेशीर हातगाडया सुरु असतात. त्याकडे पोलिसांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.