फलटण – आसू (ता. फलटण) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव आप्पासाहेब निंबाळकर उर्फ दादाराजे खर्डेकर (वय 81) यांचे हृदयविकाराने निधन झाले. माजी मंत्री कै. अभयसिंहराजे भोसले यांचे मेहुणे असलेल्या दादाराजे यांच्या पश्चात भाऊ बंटीराजे, मुलगा शिवरुपराजे, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे.
आसू येथील आपल्या निवासस्थानी आज (दि.16) रोजी सकाळी 11 वाजता त्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी फलटण येथील खासगी रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉं. जे. टी. पोळ यांनी सांगितले. दादाराजे यांचे निधन झाल्याचे वृत्त शहर व तालुक्यात पसरताच त्यांच्या अंतिम दर्शनासाठी दवाखान्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रतिभा धुमाळ, नगराध्यक्षा सौ. नीताताई नेवसे, नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्यासह नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण एज्युकेशन सोसायटी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंक आदी संस्थांतील अधिकारी, पदाधिकारी आदींचा समावेश होता. दादाराजे संयमी, शांत, मनमिळाऊ स्वभावाचे होते. जिल्हा बॅंकेचे ते तीस वर्ष संचालक होते. एक वेळ या बॅंकेचे चेअरमनपदही भूषविले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते जवळचे मित्र होते.
कॉंग्रेस (एस) च्या स्थापनेपासून ते शरद पवारांबरोबर आहेत. तत्कालीन परिस्थितीत दादाराजे यांनी चार आमदार निवडून आणले होते. फलटण पूर्व भागात त्यांचे राजकीय वर्चस्व होते. स्थानिक स्वराज संस्थामध्ये त्यांचे अखेरपर्यंत वर्चस्व राहिले. आसू गावातील सोसायटी, ग्रामपंचायत शेवटपर्यंत त्यांच्या ताब्यात राहिली आहे. फलटण तालुक्यातील एक जुने जाणते अनुभवी व्यक्तीमत्व हरपल्याने शहर व तालुक्यावर शोककळा पसरली आहे.