भावाने बांधली बहिणीला राखी : सामाजिक बांधिलकीतून वीण घट्ट
पिंपरी – बहिण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक संस्था, संघटनांकडून सामाजिक बांधिलकी जागवत या सणाला अनोखे महत्त्व प्राप्त करुन दिले. एवढेच नव्हे तर यंदा भावाने बहिणीला राखी बांधण्याचाही अनोखा उपक्रम शेखर ओव्हाळ फाउंडेशनच्या वतीने
राबविण्यात आला.
परंपरेला फाटा देत शेखर ओव्हाळ फाउंडेशनने महिलांना राख्या बांधून त्यांच्या सुरक्षिततेचा संदेश दिला. कुटुंबसंस्कृती टिकवणाऱ्या, सुदृढ समाज घडवणाऱ्या महिलांचा मान राखण्यासाठी त्यांनाच राखी पाठवण्याचा नवा पायंडा माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी पाडला. शेखर ओव्हाळ म्हणाले की, भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहीण त्याला राखी बांधते, ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. परंतु बदलत्या काळाबरोबर सगळ्या गोष्टी बदलत आहेत.
महिला कमकुवत नसून त्याही पुरुषांसारख्या सामर्थ्यवान आहेत. विविध क्षेत्रात महिलांनी स्वतःचा ठसा उमटविला आहे. महिला हीच आपल्या कुटुंबाची, पर्यायाने आपल्या राज्याची आणि देशाची खरी रक्षणकर्ती आहे. महिला आहेत म्हणूनच आपली कुटुंबसंस्कृती टिकून आहे. समाजात स्वतःला सिद्ध करताना स्त्री कुटुंबावरील मायेचा पदर हटू देत नाही. महिलांच्या या कर्तव्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पिंपरी सेवा केंद्राच्या वतीने पोलीस स्टेशन, लष्करी कार्यालय, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, वृत्तपत्र विभाग, विविध रुग्णालये, बॅंक, महाविद्यालये, राजकीय व सामाजिक कार्यालय, धार्मिक संस्था या ठिकाणी रक्षाबंधन करण्यात आले. ब्रम्हकुमारी सुरेखा, सुप्रिया, श्रद्धा, मंगल, अपर्णा विटवेकर, रुपाली जगताप, अन्नपूर्णा जेवरानी, अनुप पाटील, सरदार पाटील, मयूर पाथरकर, निलेश थोरात यांनी संयोजन केले.
कामगार नेते इरफान सय्यद यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात विविध घटकांमध्ये काम करणाऱ्या सुमारे तीन हजार महिलांना शिवबंधनाच्या राख्या पाठवण्यात आल्या. कचरावेचक, भाजी विक्रेत्या, डॉक्टर, नर्स, शिक्षिका, पोलिस, वकील, बांधकाम कामगार, कंपनीच्या महिला कामगार आणि अधिकारी, गृह उद्योजक अशा विविध घटकातील महिलांचा त्यात सहभाग होता.
पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशनने पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरे केले. असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महिला शहराध्यक्षा अनिता तुतारे, शर्वरी जळमकर, नयना चव्हाण, नेहा भवर यांनी राख्या बांधून ओवाळले. यावेळी निखिल येवले, संतोष साठे, सचिन लाड, विनेश भोजे, अमेय देशपांडे, शुभम चिंचवडे, कुणाल मोरे, दिनेश माळवे, प्रणव बुर्डे, शुभम ससे आदी उपस्थित होते.