विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ‘अ’शुद्धलेखन

“अचूक मुद्रितशोधन’ न करता अभ्यासक्रम वेबसाईटवर “अपलोड’

– कल्याणी फडके

पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी भाषेच्या बहिरस्थ अभ्यासपत्रिकेमध्ये “शुद्धलेखना’च्या घटकामध्ये “अशुद्ध’ लेखन “प्रकाशित’ झाले आहे. मराठी भाषेच्याच अभ्यासक्रमामध्ये चुका असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमामध्ये बदल करावा, अशी मागणी केली आहे. “मराठी’च्या अभ्यासक्रमाची “अशुद्ध’ स्थिती पाहता “अन्य’ विषयांच्या अभ्यासक्रमांच्या लेखनाबाबत साशंकताच आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने “वेबसाईट’ अपडेट केली. प्रत्येक सूचना, माहिती, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, निकाल अशा एक ना अनेक गोष्टी विद्यापीठाच्या “वेबसाईट’वर “अपलोड’ केल्या आहेत. वेळोवेळी विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबी “अपडेट’ करण्यात येतात. मात्र, विद्यापीठाच्या बहिरस्थ अभ्यासक्रमाच्या विभागाकडून “अचूक मुद्रितशोधन’ न करता अभ्यासक्रम “अपलोड’ केला आहे.

शैक्षणिक वर्ष जून 2013-14 पासून पुनर्रचित केलेल्या “एम.ए. मराठी’च्या अभ्यासक्रमामध्येच शुद्धलेखनाच्या अनेक चुका आहेत. याचे योग्य मुद्रितशोधन न करता हा अभ्यासक्रम महिनोंमहिने विद्यापीठाच्या “वेबसाईट’वर झळकत आहे.

“एम.ए. मराठी’ची “व्यावहारिक आणि उपयोजित मराठी भाग 1′ ही अभ्यासपत्रिका याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र विद्यापीठाकडून नियमित परीक्षांच्या अभ्यासपत्रिकेचे लेखन “शुद्ध’ केले असल्याचे चित्र “मराठी विभागाच्या संकेतस्थळा’वर दिसत आहे.

या अभ्यासपत्रिकेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, “मराठीच्या प्रमाण “भाषेचे लेखन व मुद्रितषोधन’ या पहिल्या घटकाच्या नावातच “बाराखडी’चे तर मुद्रितशोधन, प्रकाशन, वाङ्‌मयामध्ये देखील “भाषेच्या नियामांनुसार’ “मुद्रितशोधन होणे आवश्‍यक आहे.

“शुद्धलेखना’ऐवजी “षुद्धलेखन’

पहिल्या अभ्यासपत्रिकेमध्ये “शुद्धलेखन’ या शब्दाऐवजी “षुद्धलेखनाची संकल्पना’, “आवष्यकता’, “षुद्ध करून लिहिणे’, “षुद्ध लेखनाचे नियम दिलेला उतारा षुद्ध करून लिहिणे’ असे लिहिले आहे. तर “ब’ या उपप्रकारामध्ये मुद्रितशोधनाऐवजी “मुद्रितषोधनाची संकल्पना’, “उताऱ्याचे खुणांच्या साहायाने मुद्रितषोधन करणे’ असे “अशुद्ध लेखन’ केले आहे.

“श’ की “ष’ याबाबत “एम.ए.मराठी’च्या अभ्यासक्रमात संभ्रम?
अभ्यासपत्रिकेमध्ये भाषेपासून कौशल्यांपर्यंत सर्वच ठिकाणी “श’च्या ऐवजी “ष’ आणि “ष’च्या ऐवजी “श’ याबाबत संभ्रम दिसत आहे. अभ्यासपत्रिका पाहिल्यास “भाशा’, “विषेशांक’, “प्रकाषन’, “मुखपृश्‍ठ’, “मलपृश्‍ठ’ ही केवळ निवडक उदाहरणे असल्याचे चित्र पाहायला मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.