डी.एड. पदवीधर शिक्षकांना पदोन्नती द्यावी

डी.एड., कला-क्रीडा शिक्षक-शिक्षकेतर संघाचा आंदोलनाचा इशारा

पुणे – राज्यातील एसएससी डी.एड व एचएससी डी.एड झालेल्या खासगी शाळांमधील पदवीधर शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नत्या देण्याबाबत शैक्षणिक संस्थांकडून टाळाटाळ होत आहे. यामुळे 15 हजार पदवीधर शिक्षक पदोन्नतीपासून वंचित आहेत. त्यांना न्याय मिळावा, यासाठी पदवीधर डी.एड., कला-क्रीडा शिक्षक-शिक्षकेतर संघाने राज्य शासनाकडे अनेकदा गाऱ्हाणे मांडले. मात्र, त्याची दखल घेतली नाही. यामुळे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अनेक शिक्षकांनी नोकरी करत असतानाच बी.ए., बी.एड. एम.ए., बी.एड., एम.फील आदी शिक्षण पूर्ण करत शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्या. त्यांना पदोन्नत्यांचे लाभ मिळावेत, अशी मागणी बऱ्याचदा केली. शासनाने त्याची दखल घेत परिपत्रकेही काढली. मात्र, शिक्षणाधिकारी, संस्थाचालक यांच्याकडून अंमलबजावणी होत नसल्याचे संघटनेचे सचिव महादेव माने यांनी सांगितले. राज्य शासनाने गेल्या महिन्यात पदोन्नतीच्या नियमावलीबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत.

संघटनेच्या वतीने 4 हजार हरकती नोंदवल्या आहेत. त्याचा विचार व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. संघटनेचे अध्यक्ष दिलीप आवारे, सचिव महादेव माने, कार्याध्यक्ष भास्कर काळे, उपाध्यक्ष दीपक आंबवकर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. यावर निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.