गुजरात – अरबी समुद्रात बिपारजॉय चक्रीवादळचा धोका वाढत आहे. हळूहळू हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही दिवसांत अधिक तीव्र चक्रीवादळात बदलणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ 13 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावर पोरबंदरच्या नैऋत्येस सुमारे 290 किमी आणि जाखाऊ बंदराच्या दक्षिण-नैऋत्येस 360 किमी अंतरावर केंद्रीत झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ पार करण्याची शक्यता आहे, अशी माहिती नुकतीच भारतीय हवामान विभागाने ट्विटीरद्वारे दिली आहे.
बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ पोर्ट ओलांडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याची खबरदारी घेत स्थानिक प्रशासनाकडून किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे काम केले जात आहे. तसेच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमध्ये अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाचा फटका पिकांनाही बसण्याची शक्यता आहे. वादळामुळे रेल्वे सेवा आणि वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
VSCS Biparjoy lay centered at 0230 IST of the 13th June, 2023 over Northeast and adjoining Eastcentral Arabian Sea about 290 km southwest of Porbandar & 360 km south-southwest of Jakhau Port. To cross Saurashtra & Kutch near Jakhau Port by evening of 15th June as a VSCS. pic.twitter.com/aTM24KvUsT
— India Meteorological Department (@Indiametdept) June 13, 2023
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 15 जूनच्या संध्याकाळी बिपारजॉय चक्रीवादळ ताशी 125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह गुजरातमध्ये धडकणार असल्याची माहिती आहे. मुंबई किनारपट्टी भागात बुधवारी देखील वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किलोमीटर दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 14 आणि 15 जून दरम्यान कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.