पुणे- मोबाईलवर आलेला मेसेज वाचून लिंक डाऊनलोड करताच एका ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून एक लाखाची रक्कम सायबर भामट्याने काढून घेतली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अज्ञात मोबईल व बॅंक खातेधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वारजे माळवाडी येथे रहाणाऱ्या 79 वर्षीय व्यक्तीने नाशिक येथे काही महत्वाची कागदपत्रे कुरिअर केली होती. ही कागदपत्रे संबंधीत व्यक्तीला मिळाली नाहीत.
यामुळे त्यांनी चौकशीसाठी कुरिअर कंपनीला फोन केला असता तो उचलला गेला नाही. मात्र त्यांच्या मोबाईलवर कॅन आय कॉल यू बॅक लॅटर असा मेसेज आला. यामेसेज सोबत हेल्प डेस्क हे ऍप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करण्यास सांगितले गेले.
हे ऍप डाऊनलोड करुन त्यांना पाच रुपये ऑनलाईन भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी पैसे भरताच त्यांच्या बॅंक खात्याची डिटेल्स चोरुन खात्यातून एक लाख रुपये वर्ग करण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमृत मराठे करत आहेत