पुणे :- एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक 2023 क्रिकेट स्पर्धेतील 30वा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यातील सामना आज (सोमवार,दि.30) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर रंगणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका
वेळ – दुपारी 2 पासून
ठिकाण – पुणे
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस नेटवर्क
श्रीलंका व अफगाणिस्तान हे दोन्ही संघ प्रत्येकी 4 गुणांसह गुणतालिकेत अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. या दोन्ही संघांनी यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत 5 सामने खेळले असून, 2 सामन्यात विजय तर तीन सामन्यात पराभव अशी स्थिती आहे.
दोन्ही संघांना प्रत्येकी चार सामने खेळायचे असून, हे सर्व सामने त्यांनी जिंकले तर या दोन संघांपैकी एका संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची अद्याप संधी आहे.
श्रीलंका संघाला लाहिरू कुमाराच्या दुखापतीमुळे मोठा फटका बसला असून, या सामन्यासाठी त्याच्या जागी दुष्मंत चमिराचा संघात समावेश करण्यात आला आहे. नेदरलॅंड व इंग्लंडचा पराभव केल्यावर सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी श्रीलंकेचा संघ सज्ज आहे.
दुसरीकडे यंदाच्या स्पर्धेत यशस्वी वाटचाल केलेल्या अफगाणिस्तानचे श्रीलंकेसमोर मोठे आव्हान राहणार आहे. अफगाणिस्ताननेही इंग्लंड व पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे तेदेखील स्पर्धेतील अव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेला धक्का देऊ शकतात.