World Cup 2023 New Zealand vs South Africa Match Toss Update : एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक 2023 क्रिकेट स्पर्धेतील 32 व्या सामन्यात आज (बुधवार,दि.1 नोव्हेंबर ) भरात असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान राहणार आहे. यंदा ज्या पद्धतीने या दोन्ही संघांनी वाटचाल केली आहे ती पाहता त्यांपैकी एक संघ अंतिम फेरी निश्चितच गाठेल मात्र, त्यापूर्वी त्यांना आज होणारा सामना जिंकणे महत्वाचे आहे. हा सामना दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे.
तत्पूर्वी,न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दोन्ही संघ प्रत्येकी एक बदल करून मैदानात उतरले आहेत. लॉकी फर्ग्युसनच्या जागी टीम साऊदीचे न्यूझीलंड संघात पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी तबरेझ शम्सीच्या जागी कागिसो रबाडा दक्षिण आफ्रिकेच्या संघात परतला आहे.
हे दोन्ही संघ (SA v NZ) 71 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात दक्षिण अफ्रिकेने 41, तर न्यूझीलंडने 25 सामन्यात विजय मिळवला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हे संघ 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यात न्यूझीलंडने 6, तर दक्षिण अफ्रिकेने 2 वेळा विजय मिळवला आहे.
दरम्यान, या स्पर्धेत यंदा दक्षिण आफ्रिकेने सातत्यपूर्ण कामगिरी करताना सहा सामने खेळले असून त्यात पाच विजय मिळवत गुणतालिकेत 10 गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले आहे. त्यांना केवळ एकच पराभव स्वीकारावा लागला आहे. न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर असून त्यांचे 6 सामन्यांतून 4 विजय व 2 पराभवांसह 8 गुण झाले आहेत. भारतीय संघ गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वलस्थानी आहे.