World Cup 2023 PAK Vs ENG : चांगल्या कामगिरीच्या मोठ्या अपेक्षेसह भारतीय जमिनीवर पाऊल ठेवलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतील आव्हान इंग्लंडकडून 93 धावांनी पराभूत झाल्यानंतर संपुष्टात आले. उपांत्यफेरीचे तिकीट मिळविण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळविण्याची आवश्यकता होती. जी गोष्ट जवळपास अशक्य होती. परंतू आपल्या खराब कामगिरीमुळे तळाशी राहिलेल्या गतविजेत्या इंग्लंड संघाने पाकिस्तानला नमवताना त्यांच्या लाहोरच्या परतीच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केले.
ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 337 धावा केल्या. अशा परिस्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असल्यास, केवळ 6.4 षटकांत म्हणजेच 40 चेंडूंत 338 धावा कराव्या लागणार होत्या. असा दुर्मिळ चमत्कार केल्यासच ते न्यूझीलंडला मागे टाकून उपांत्य फेरी गाठू शकणार होते. असे असताना पाकिस्तानकडून सलमान अली अघा (51) कर्णधार बाबर आझम (38) व महंमद रिझवान(36) व्यतिरिक्त अन्य कुठलाही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.
इंग्लंडची चांगली फलंदाजी
इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानविरुद्ध चांगली फलंदाजी केली. इंग्लंडच्या आघाडीच्या फळीतील सर्व फलंदाजांनी योग्य धावा केल्या आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक धावा केल्या. स्टोक्सने 82 धावांची इनिंग खेळली, तर जो रुटचा(60) फॉर्मही परत आला. जॉनी बेअरस्टोने 59, डेव्हिड मलान 31 धावांची खेळी करत संघाला 50 षटकात 9 गडी गमावून 337 धावांपर्यंत मजल मारून दिली.