World Cup 2023 India vs Netherlands : – भारत आणि नेदरलॅंड्स यांच्यात येथील एम. चिन्नास्वामी मैदानावर रविवारी विश्वकरंडक स्पर्धेतील 45 वा सामना खेळवला जाणार आहे. उपांत्य फेरीपूर्वीचा हा या विश्वकरंडकातील शेवटचा सामना असेल. भारतीय संघाने यापूर्वीच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले असले तरी या सामन्यातून कर्णधार रोहित शर्मा पुढील सामन्यांसाठी संघात महत्वपूर्ण प्रयोग करताना दिसू शकतो. यासह रोहितला वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या विक्रमाला मागे टाकून विश्वकरंडकाचा “सिक्सर किंग’ बनण्याची संधी आहे.
विश्वकरंडकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. 2015 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये गेलने 26 षटकार मारले होते. या विक्रमात रोहित आणि ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या स्थानावर आहेत. गेलचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला पाच षटकारांची गरज आहे. यंदाच्या स्पर्धेत त्याने तब्बल 22 षटकार ठोकले आहेत. तर मॅक्सवेलही 22 षटकारांसह रोहितची बरोबरी केली आहे.
यंदाच्या स्पर्धेतील उल्लेखनीय बाब म्हणजे, भारताने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत आणि त्यातील सर्व जिंकले आहेत. पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. नेदरलॅंड्सविरुद्धच्या सामन्यानंतर टीम इंडिया मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड संघाविरुद्ध सेमीफायनल खेळणार आहे. तर यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.
दुसरीकडे, नेदरलॅंड संघाची कामगिरी यंदाच्या स्पर्धेत आश्चर्यकारक राहिलेली नाही. त्यांना यंदा केवळ दोन सामन्यांत विजय मिळवता आलेला आहे. तरीही, स्पर्धेतील आपल्या अखेरच्या सामन्याक बलाढ्य व अजिंक्य भारताला पराभूत करून क्रिकेट विश्वात सनसनाटी निर्माण करण्यासाठी नेदरलॅंडचे खेळाडू आपले अस्तित्व पणाला लावतील यात शंका नाही. तर भारताकडून कर्णधार रोहित उपांत्यफेरीपूर्वी कोणत्या खेळाडूला विश्रांती देतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रोहित उत्तम कर्णधार- द्रविड
“रोहित शर्माने टीमचा कर्णधार आणि सलामीवीर या दुहेरी भूमिकेशी उत्कृष्टपणे जुळवून घेतले आहे. भारताच्या विश्वकरंडकातील आठ सामने जिंकण्याच्या अजिंक्य मालिकेत त्याचा एक महत्त्वाचा वाटा आहे,’ असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शनिवारी येथे बोलताना व्यक्त केले. भारताचे शानदार नेतृत्व करण्यासोबतच, रोहितने सलामीवीर म्हणूनही आपल्या संघाला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. त्याने विश्वकरंडकात आठ सामन्यांत 122 च्या स्ट्राईक रेटने 443 धावा केल्या आहेत, असेही द्रविड यांनी पुढे म्हटले आहे.
प्रेक्षकांचा विक्रम मोडणार
यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत स्टेडियममध्ये प्रत्यक्षात हजर राहूण आतापर्यंत 10 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी आनंद लुटला आहे. ज्यामुळे विश्वकरंडक-2023 आयसीसीच्या इतिहासात स्टेडियममध्ये सर्वाधिक प्रेक्षकांनी हजेरी लावलेली स्पर्धा होण्याच्या उंबरठ्यावर आहे. आयसीसीनुसार, स्पर्धेत अद्याप 4 सामने बाकी आहेत आणि शुक्रवारी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात 10 लाख प्रेक्षकांचा आकडा पार पडला आहे. यंदाच्या स्पर्धेने यापूर्वीच डिजिटल आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहण्याचे अनेक विक्रम मोडले आहेत.