Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत खुलासा केला आहे. यंदा दिवाळीनिमित्त मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी सलीम-जावेद यांनी केले. त्यानंतर या सोहळयाच्या दुसऱ्या दिवशी अनेक बॉलीवूड अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात राज ठाकरेंनी विकी कौशलच्या भूमिकेबाबत पहिल्यांदाच माहिती दिली आहे.
दुसऱ्या दिवशीच्या सोहळ्याच्या या कार्यक्रमात अभिनेता विकी कौशल, निर्माता-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिराणी तसेच निर्माते साजीद नाडियाडवाला यांनी हजेरी लावली. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “विकी कौशल याच्याबद्दल काय सांगण्याची गरज नाही, अतिशय प्रसिद्ध कलाकार आहे, त्याचा पुढचा चित्रपट सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या सिनेमात धर्मवीर संभाजीच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. त्याचेही प्रमोशन आज नाही. मलाही आताच कळाले आहे. त्यामुळे सिनेमा खोटी दाढी नको म्हणून भूमिकेसाठी त्याने खरी दाढी वाढवली आहे,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.
त्याचसोबत मी आज भाषण करायला आलो नाही, माझे मित्र माझ्या विनंतीला मान देऊन येथे आले असल्याचे म्हणत त्यांनी राजकुमार हिरानी, साजिद नाडियावाला, आशुतोष गोवारीकर, विकी कौशल यांच्यासह इतर इतर कलाकारांचेही आभार मानले. दरम्यान, अभिनेता विकी कौशल ‘सॅम बहादूर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये ‘सॅम बहादूर’ प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.